पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव
अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाणे रायगड जिल्ह्यात ‘स्मार्ट पोलीस ठाणे’ ठरले असून ‘ए ++’ नामांकन मिळाले आहे. याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याबाबत मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे कौतुक करत सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक भोई यांनी पोलीस ठाण्यातील आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने विविध गुन्ह्याची उकल व तपासणी करून पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांवरती वचक निर्माण केला आहे. यामुळे इतर सर्वच गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नुकतेच झालेल्या अधिवेशन काळात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर देवस्थानच्या ठिकाणी झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीला चोवीस तासाच्या आत गुन्हा दाखल करून त्याच्यावर न्यायालयात चार्जशीट दाखल केली होती व त्यात लगेच गुन्हा शाबूत होऊन आरोपीला जेरबंद करण्यात आले होते. याबद्दल मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे विशेष कौतुक केले आहे.
मांडवा सागरी पोलिसांनी अशा अनेक प्रकरणात दैदिप्यमान कामगिरी केल्याबद्दल त्यांनी रायगड जिल्ह्यात ‘स्मार्ट’ पोलीस ठाणे दर्जा व ए ++ नामांकन प्राप्त करत प्रमाणपत्र मिळविले आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याहस्ते मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक भोई यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी रायगड जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.