• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘कुणाल कामरा मुंबईत आल्यावर जरूर स्वागत करणार’, संजय शिरसाट यांचा इशारा

ByEditor

Apr 8, 2025

मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं. यावरून कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यामुळे राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटलं होतं. या प्रकरणी कुणाल कामराच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावलं. मात्र, चौकशीसाठी कुणाल कामरा हजर झाला नाही. तसेच कुणाल कमराला मद्रास उच्च न्यायालयाने १७ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच दुसरीकडे कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात देखील धाव घेतली असून पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी कुणाल कामराला मोठा इशाराही दिला आहे. कुणाल कामरा मुंबईत आल्यावर जरूर स्वागत करणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

कुणाल कामराच्या गाण्यानंतर राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटल्याच्या संदर्भात शिरसाट यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. यावेळी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “कुणाल कामरा लोकांना गद्दार म्हणत आहे. मात्र, कामरा जेव्हाही मुंबईत येईल तेव्हा जशास तसं उत्तर दिलं जाईल. त्याच्यावर कायदेशीर कारवाई नक्कीच होईल. तसेच कुणाल कामरा मुंबईत आल्यानंतर स्वागत करावंच लागेल. कारण तो एवढा मोठा व्यक्ती आहे, मोठा स्टार आहे. त्याचं स्वागत आम्ही जरूर करणार”, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!