मुंबई: महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अपघातग्रस्त रुग्णांना आता 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार करता येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता व तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप देखील तयार करण्यात येणार आहे. दर महिन्याला प्रत्येक रुग्णालयाने आरोग्य शिबिर घेऊन किमान 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार करणे बंधनकारक असणार आहे. योजनेतील विविध सुधारणांसाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून एक महिन्यात अहवाल सादर करावा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेस गती देण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार व सेवा केंद्रांच्या मदतीने वाटप होणार आहे. या योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे देखील आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी निर्देश दिले आहेत.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असेल किंवा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये अनियमितता होऊ नये, रुग्णाला त्रास होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या तिन्ही विभागाचे अहवाल येतील आणि त्यावर कारवाई होईल. ट्रस्ट अॅक्ट खाली ही संस्था असल्यामुळे राज्य शासनाच्यावतीने कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रकाश आबिटकर यांनी दिली. सगळ्यांचा आग्रह हा ज्या पद्धतीने रुग्णाला त्रास झाला, त्यामुळे ज्यांनी दिरंगाई केली असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठीच आहे. मात्र तिन्ही रिपोर्ट्स मधील सत्यता येईल त्यावरच कारवाई होईल, असंही प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
आरोग्य विभाग हा त्यांचा रिपोर्ट देईल, ससूनने तपासणी केली त्याचा रिपोर्ट जाईल, तिसरा राज्य शासनाचा विधी व न्याय विभागाचा असेल यांचाही रिपोर्ट येईल. तिन्ही रिपोर्ट एकत्रित करून त्यावर शासन सूचना देईल, असं प्रकाश आबिटकर म्हणाले. एखादी गोष्ट चुकीची असेल त्यावर आक्षेप घेणं हे सर्वांची जबाबदारीच आहे. सर्वांची वस्तुस्थिती बघूनच शासन त्यावर निर्णय घेईल. चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल तर त्यावर योग्य ते आदेश तिन्ही रिपोर्ट आल्यानंतरच दिले जाईल वस्तू स्थिती बघूनच कारवाई होईल. पुढील दोन ते तीन दिवसात अहवाल येईल. त्यावर कारवाई संदर्भात सूचना मिळतील, असं प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.