• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शेडसई सरपंचांवरील अविश्वास ठराव नामंजूर

ByEditor

Aug 2, 2023

‘आम्ही संपूर्ण ग्रामपंचायत ताब्यात घेतो’ अशा वल्गना करणाऱ्यांना चपराक

अमोल पेणकर
रोहे :
तालुक्यात वीस वर्षे मिळालेल्या सर्वांगीण सत्तेचा केवळ आपल्या फायद्यासाठी वापर केलेल्यांना आता विविध आमिषं दाखवत विरोधी गटातील सरपंच व सदस्य फोडाफोडी करत आपल्या झेंड्याखाली आणण्यासाठी आटापीटा करावा लागत आहे. निव्वळ सत्तेचा वापर करत एखाद्या पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्या त्यातही महिला सरपंचांना विविध प्रकारे त्रास देत त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी सर्व सदस्यांना आपल्या पक्षात घेत त्यांचेकडून सरपंचांवर रोहे तहसीलदार यांचे कार्यालयात ३१ मे २०२३ रोजी अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती. यावर रोहे तहसीलदार यांनी घेतलेल्या विशेष बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र या मनमानी कारभारा विरूध्द शेडसई सरपंच प्रिया दिनेश कडू यांनी जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात दाद मागितली. यावर जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी सर्व बाजु तपासून रोहे तहसीलदार यांनी दिलेला निर्णय अमान्य करून सरपंचांवरील अविश्वास ठराव हा नामंजूर असल्याचा आदेश बजावला आहे. सत्तेच्या सारीपाटात माहीर असलेले, महिला सबलीकरण व सक्षमीकरण यांचा उदोउदो करणाऱ्यांना एका महिला सरपंचानेच चितपट केल्याची चर्चा या निकालानंतर रोह्यासह संपूर्ण रायगडमध्ये होत आहे.

रोहे तालुका हा राजकीय दृष्टीने नेहमीच चर्चेत राहिला आहे. ग्रामपंचायत स्तरावर होणारे सरपंच, सदस्य फोडाफोडी व पळवापळवी राजकारणाने कळस गाठला आहे. याच मालिकेत रोहे तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायतीमध्ये गेली दोन वर्षे होणारा राजकीय घटनाक्रम समाविष्ट आहे. सन २०२१ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या ७ सदस्यामधून प्रिया दिनेश कडू यांची सरपंचपदी निवड झाली. मात्र, तालुक्यातील प्रस्तापीतांच्या इशाऱ्यावर न चालता ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी सरपंचांनी आपले काम सुरु केले. मात्र, सर्वत्र आपलाच झेंडा फडकावा असे वाटणाऱ्या मातब्बर नेत्यांना हे सहन होत नव्हते. राज्यात ज्या प्रमाणे राजकीय स्थित्यंतरे होत होती तसे प्रवाह शेडसई ग्रामपंचायतीत उमटताना दिसत होते. निवडणूक झाल्यानंतर ४ विरूध्द ३ अश्या फरकाने सरपंच पदी विजयी झालेल्या प्रिया कडू यांना राजकीय, वैयक्तिक स्वार्थापोटी सर्व सदस्यांकडून विरोध होवु लागला. अखेर मे २०२३ मध्ये सर्व सदस्यांकडून सरपंच कडू यांचेवर अविश्वास असल्याची नोटीस रोहे तहसीलदार यांना देण्यात आली. यावर ५ जून २०२३ रोजी तहसीलदार रोहे यांनी शेडसई ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले होते. मात्र यासभेची नोटीस अपिलार्थी सरपंच यांच्यावर न बजावता त्यांची नोटीस १ जुन २०२३ रोजी पंचनामा करून अपिलार्थी यांच्या सासूबाई यांची सही पंचनाम्यावर घेतली व ही नोटीस त्यांचे घरावर चिकटवली. असे असतानाही सदर बैठकीस सरपंच प्रिया कडू उपस्थित राहिल्या होत्या.

एकूणच ही झालेली बैठक त्याचे कोणतेही इतिवृत्त नोंद न करता सर्व कामकाज हे मनमानीपणे करत सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर केला होता. याप्रकरणी सरपंच प्रिया कडू यांनी जिल्हाधिकारी रायगड यांचेकडे अपील करत न्याय मागितला होता. यावर जिल्हाधिकारी यांनी रोहे तहसीलदार यांनी केलेली सर्व कारवाई ही मनमानी व बेकायदेशीर असून ग्रामपंचायत अधिनियमानुसार नसल्याचे निरीक्षण नोंदवले. अखेर ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी रायगड यांनी लेखी आदेशानुसार सरपंच प्रिया दिनेश कडु यांचेवरील अविश्वास ठराव अवैध ठरवला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!