• Thu. Jul 31st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देणार, पडद्यामागे असणाऱ्यांनाही सोडणार नाही; राजनाथ सिंहांचा इशारा

ByEditor

Apr 23, 2025

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून दहशतवाद्यांना संपवा अशी मागणी केली जात आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. धर्माच्या आधारे पर्यंटकांची हत्या करणे, निर्दोषांना ठार करणे हे कृत्य निंदनीय आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाणार अशा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला. या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांसोबतच पडद्यामागे जे कोणी यामध्ये सहभागी असतील त्यांना संपवलं जाईल असंही राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह म्हणाले की, “दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात आपल्या देशाने अनेक निष्पाप नागरिकांना गमावले. या अत्यंत अमानुष कृत्याने आम्हा सर्वांना दुःख आणि वेदना झाल्या आहेत. सर्वप्रथम ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्व कुटुंबांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या प्रसंगी, दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी, मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.”

राजनाथ सिंग पुढे म्हणाले की, “आम्ही दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण (Zero Tolerance Policy) बाळगतो. या भ्याड कृत्याविरुद्ध भारतातील प्रत्येक नागरिक एकवटला आहे. मी देशवासियांना आश्वासन देतो की, ही घटना लक्षात घेता भारत सरकार आवश्यक आणि योग्य ते सर्व पाऊल उचलेल. ज्यांनी पडद्याआड बसून भारताच्या भूमीवर अशी घृणास्पद कृत्ये करण्याचा कट रचला आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू.”

पहलगाममध्ये मृत्यूचं तांडव घडवून आणणाऱ्या त्या चार मानवरुपी दानवांचे फोटो समोर आले आहेत. आदिल गुरू, आसिफ शेख, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी त्यांची नावं आहेत. यातील दोन जण स्थानिक आहेत, तर दोन जण पाकिस्तानी आहेत. आदिल गुरी हा अनंतनाग जिल्ह्यातला आहे, तर आसिफ शेख हा सोपोरचा आहे. या हल्ल्यामागचा मास्टरमाईंड हा सैफुल्लाह खालिद उर्फ सैफुल्लाह कसुरी हा असल्याचं समोर आलं आहे. तो टीआरएफ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असून हाफिज सईदचा तो निकतवर्तीय असल्याची माहिती आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!