विनायक पाटील
पेण : डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म विथ स्मार्ट क्लासरूम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शहरातील मुलांसारखे उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे व त्यांनाही डिजिटल पॅनेलचा वापर करता यावा या हेतुने सीएफआय संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सीएफआय रायगड युनिट व बीएनवाय मेलन यांच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यातील एकूण ८ शाळांमध्ये दोन वर्षापूर्वी डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म विथ स्मार्ट क्लासरूम या उपक्रमांतर्गत डिजिटल पॅनल लावण्यात आले आहेत.

या उपक्रमाचा आढावा घेतला असता शाळेतील शिक्षक व विद्यार्थांना डिजिटल पॅनेलचा फायदाच झाल्याचे कळून आले. डिजिटल पॅनेलमुळे शिकवण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाला आहे. डिजिटल पॅनेलमुळे आता एखादा घटक सहज व सोप्या पद्धतीने समजावता येतो. डिजिटल पॅनेलमुळे मुलांना अमूर्त कल्पना या समजावून सांगितल्यावर प्रत्यक्ष दाखवणे शक्य झाले आहे. काही शाळांमध्ये मुलांना युट्यूबद्वारे प्रॅक्टिकल्स तसेच अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर गोष्टी जसे कि नृत्य, विज्ञान प्रकल्प, ऐतिहासिक गोष्टी शिकवल्या व दाखवल्या जात आहेत आणि यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती उंचावण्यास मदत होत आहे. त्यामुळे मुलांचा शिकण्याचा व शिक्षकांचा शिकवण्याचा उत्साह देखील वाढला आहे.सीएफआयने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिक्षक, विदयार्थी तसेच पालकांनी हि सीएफआयचे आभार मानले आहेत.
