वन्य आणि पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याबाबत कोणतीच उपाययोजना नाही
मिलिंद माने
महाड : पिण्याच्या पाण्याची गरज केवळ मानवालाच नसून निसर्गातील प्रत्येक जीवाला पाण्याची गरज आहे. महाड तालुक्यात ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे तेथील सुमारे 6000 पाळीव जनावरे पिण्याच्या पाण्यासाठी व्याकुळ झाले आहेत. दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी घटू लागली आहे. यामुळे वन्य पशुपक्षी देखील पाण्यासाठी वणवण करत मानवी वस्तीत फिरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनाने वन्य प्राण्यांच्या तसेच पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याकडे देखील तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे.

महाड तालुक्यामध्ये २६ ग्रामपंचायतीमधील ८ गावे आणि १०० वाडी वस्त्यांवर पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. या ठिकाणी असलेल्या जवळपास 26 हजार लोकसंख्येपैकी सहा हजार पाळीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. ग्रामीण भागामध्ये पूर्वी जनावरांसाठी नैसर्गिक पानवटे उपलब्ध होते मात्र, गेले काही वर्षांमध्ये पाण्याची पातळी घटल्यामुळे हे नैसर्गिक पानवटे बंद पडले आहेत. याच ठिकाणी अनेक वाड्यांवरील ग्रामस्थ आणि देखील भरत होते. मात्र या पाणीटंचाईमुळे आता ग्रामस्थांबरोबर पाळीव प्राण्यांचे आणि वन्य प्राण्यांचे देखील हाल होऊ लागले आहेत. याबाबत वनविभाग आणि शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून उपाय योजना होणे गरजेचे होते मात्र शासनाकडून फक्त मानवी वस्त्यांवर येण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी योजना राबवल्या जात असल्याचे दिसून येत आहे. वन्य भागातील नैसर्गिक झरे पानवटे बंद पडल्याने जंगली जनावरे देखील आता मानवी वस्तीकडे पाण्यासाठी वळले आहेत.
सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेला महाड तालुका हा निसर्ग संपन्न असला तरी गेली काही वर्षांमध्ये या ठिकाणी पर्यावरणीय आणि भूगर्भिय बदल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड त्याचप्रमाणे डोंगरांमध्ये होणारे खोदकाम दगड खाण्यासाठी वापरला जाणारा जिलेटिनचा वापर यासह अनेक कारणांमुळे जंगल भागातील नैसर्गिक झरे बंद पडले आहेत. याचबरोबर गावाशेजारी असलेले पिण्याचे पाण्याचे स्त्रोत देखील आटले आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तालुक्यात अनेक गावांमधून पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. तालुक्यात या 26 ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांच्या पाळीव जनावरांना यामुळे अनेक किलोमीटर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तालुक्यातील पाळीव प्राण्यांची संख्या देखील यामुळे दिवसेंदिवस घटू लागली आहे. शेतकऱ्यांनी दूध उत्पादनाकडे पाठ फिरवली असल्याने गावांमधून असलेले जनावरांचे गोठे रिकामे पडले आहेत. तरीदेखील आधुनिक शेती बरोबर दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे असलेल्या जनावरांचे या बदलत्या तापमानामुळे आणि पाण्याच्या टंचाईमुळे हाल होत आहेत.
तालुक्यामध्ये वन्य आणि पाळीव प्राण्यांसाठी शासनाकडून अशी कोणतीच योजना नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी या जनावरांचे हाल होत आहेत. उघड्यावर गटारातील पाणी या जनावरांना प्यावे लागत असल्याने या जनावरांचे आरोग्य बिघडत असल्याने त्यांच्याबरोबर मानवी आरोग्याला देखील धोका निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून वनविभाग आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे तात्पुरते पानवटे निर्माण करणे गरजेचे आहे.
टंचाईग्रस्त 26 गावांमधील पाळीव प्राण्यांची संख्या
तालुक्यात पिंपळकोंड गावामध्ये १५०, दाभोळ ग्रामपंचायत १३५, वाकी बुद्रुक ५३८, पाचाड १८०, निगडे ४१५, निजामपूर २०, कुर्ले २०, मुमुर्शी ८५, मोहोत ४२०, टोल १३५, रावतळी ७५, करंजाडी ३५, कावळे तर्फे विन्हेरे २२३, ताम्हाणे ५१०, चोचिंदे १३५, आडी २३१, वारंगी १२५, कुंभे शिवथर १००, गोंडाळे ३२६, रेवतळे २२५, कुसगाव २२९, दासगाव ८४५, नातोंडी ३५, तळीये ३००, वीर २८५, भावे २४४ अशी पाळीव प्राण्यांची संख्या आहे.