अमुलकुमार जैन
अलिबाग : न्यायालयातून स्थगिती आदेशाची कागदपत्रे मिळवून देण्यासाठी दोन हजार पाचशे रुपयांची लाच घेणारा लाचखोर शिपाई संतोष तुकाराम माने (शिपाई, मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सीबीडी बेलापूर ९ वे कोर्ट, बेलापुर, नवी मुंबई) यास नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवी मुंबई येथील वाशी सेक्टर अकरा येथील एका अनधिकृत इमारतीच्या बांधकामाबाबत सिडको कार्यालय व नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयात तक्रारदार यांनी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका व सिडको कार्यालयाकडुन सदर इमारतीच्या सोसायटीला इमारत निष्कासित करण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली होती. सदर नोटीसच्या अनुषंगाने संबंधित सोसायटीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सिबिडी बेलापूर ९ वे कोर्ट, बेलापुर, नवी मुंबई निष्कासन कारवाई विरोधात स्थगिती मिळण्यासाठी न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याअनुषंगाने न्यायालयाने निष्कासन कारवाईस स्थगिती दिल्याने तक्रारदार यांनी न्यायालयात स्थगिती आदेशाची कागदपत्रे मिळणेकरीता अर्ज दाखल केला होता.
सदर अर्जामधील कागदपत्रे मिळवुन देण्याकरीता लोकसेवक शिपाई संतोष माने यांनी तक्रारदार यांचेकडे २,५००/- रूपयांची मागणी करीत असल्याची तक्रार नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि. ६/५/२०२५ रोजी प्राप्त झाली होती. मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ६/५/२०२५ रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी वेळी लोकसेवक हे २,५००/- रूपयांची मागणी करीत असल्याचे उघड झाले होते. त्यानुसार दि. ७/५/२०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक संतोष माने यांना तक्रारदार यांचेकडून २,५००/- रूपये लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांचेसमक्ष स्विकारताना रंगेहाथ पकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
