नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमुळे चिडलेल्या पाकिस्ताननं जम्मूमध्ये हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्ताननं जम्मूतील विमानतळावर रॉकेट डागलं. पण भारतानं हा हल्ला हाणून पाडला. भारताच्या एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेनं पाकिस्तानची ८ क्षेपणास्त्रं हवेतच नष्ट करत मोठं नुकसान टाळलं आहे. पाकिस्ताननं सांबा सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु केला आहे. त्यामुळे जम्मूच्या आरएसपुरा परिसरात ब्लॅक आऊट करण्यात आलेला आहे. इथे सायरन वाजू लागले आहेत. जम्मू शहरातील मोबाईल नेटवर्क बंद झालं आहे. सतवारी कॅम्पमध्ये हल्ला झाल्याची माहिती आहे. कुपवाड्यात गोळीबार सुरु आहे. याशिवाय पंजाबच्या गुरदासपूरमध्येही ब्लॅकआऊट करण्यात आला आहे.
भारतीय सैन्यानं अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून जमिनीवरुन हवेत मारा करता येतो. शत्रूचे क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले निष्प्रभ करण्याची क्षमता हवाई सुरक्षा यंत्रणेत आहे. सध्याच्या घडीला भारताची हीच यंत्रणा पाकिस्तानचे हल्ले परतवून लावत आहे. जम्मू विमानतळ, पठाणकोट, अखनूर सेक्टर आणि सांबा परिसरात एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. जम्मूच्या विमानतळावरुन लढाऊ विमानं झेपावलेली आहेत.
राजस्थानच्या जसलमेरमध्येही पाकिस्ताननं हल्ला केला आहे. या भागात स्फोटाचा आवाज ऐकू आला आहे. त्यामुळे जसलमेरमध्येही ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. जसलमेर प्रशासन पूर्णपणे अलर्टवर आहे. जम्मू विद्यापीठ परिसरात दोन ड्रोन पाडण्यात आले आहेत. पंजाबच्या गुरुदासपूरमध्येही ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. पठाणकोट विमानतळावरही सायरन वाजू लागले आहेत. पठाणकोटच्या सुजानपूरमध्ये ड्रोन दिसला आहे.
भारतीय सैन्यानं परवा रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर काल रात्री पाकिस्ताननं भारतावर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. तब्बल १५ शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रं डागण्यात आली. पण भारताच्या एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेनं प्रभावी कामगिरी करत सगळे हल्ले परतवून लावले. पाकिस्तानी ड्रोन, क्षेपणास्त्रं हवेतच नष्ट करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी भारतानं ड्रोनद्वारे पाकिस्तानच्या १२ शहरांवर हल्ले चढवले. पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली. त्यानंतर आता पाकिस्तान पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे.