नवी दिल्ली : पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आणि दहशतवादी संघटनांचे नऊ अड्डे नष्ट केले. ६-७ मे च्या रात्री भारतीय सैन्याच्या यशानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने ७-८ मे आणि ८-९ मे च्या रात्री भारतावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केले. पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र विमानांनी जम्मू काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंतच्या शहरांमधील भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे धाडस केले परंतु त्यापैकी कोणत्याही ठिकाणी त्यांना यश मिळाले नाही. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने त्या सर्वांना हाणून पाडले आहे. पाकिस्तानने संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे, ज्याला भारतीय सैन्य योग्य उत्तर देत आहे.
काल रात्री, पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर विविध ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. या हल्ल्यांना उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट भागात भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सडेतोड उत्तर दिले. या कारवाईत एल-७० तोफा, झेयू-२३एमएम, शिल्का प्रणाली आणि इतर प्रगत काउंटर-यूएएस उपकरणांचा मोठ्या प्रमाणत वापर करण्यात आला. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
पाकिस्तानने जम्मूवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांद्वारे भारतातील विविध शहरांमध्ये असलेल्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, जो भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडला. दरम्यान या हल्ल्यांबाबत जम्मूतील काही प्रत्यक्षदर्शीनी माहिती दिली आहे.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना, एका स्थानिक व्यक्तीने जम्मूवरील पाकिस्तानच्या हल्ल्यांबद्दल सांगितले. तो म्हणाला की, “काल रात्री आम्ही जेवायला सुरुवात करताच आम्हाला स्फोटांचे आवाज ऐकू आले. त्यानंतर पहाटे ४:३० वाजता पुन्हा स्फोटांचे आवाज ऐकू आले, परंतु आपल्या सुरक्षा दलांनी तेही निष्क्रिय केले. काळजी करण्यासारखे काही नाही. आपले सुरक्षा दल सतर्क आहेत.”
आम्हाला सैन्यावर पूर्ण विश्वास
याशिवाय, दुसऱ्या एका स्थानिक व्यक्तीने एएनआयला सांगितले की, “काल रात्री पूर्णपणे वीज खंडित झाली होती. त्यानंतर ड्रोन उडू लागले आणि रात्रभर गोळीबार सुरू होता. आपले सैन्य पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे.
ते पुढे म्हणाले की, “आम्हाला आपल्या पंतप्रधानांवर आणि आपल्या सैन्यावर विश्वास आहे. आपल्या सैन्याने सर्व ड्रोन नष्ट केले आहे. आम्हाला आपल्या देशाचा अभिमान आहे. सीमेजवळ तणाव आहे पण उर्वरित ठिकाणे सुरक्षित आहेत.”
