नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. आज दुपारी पाकिस्तानच्या डायरेक्टर्स जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) यांनी भारतीय DGMO यांना १५:३५ वाजता दूरध्वनी केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी भूभाग, हवा आणि समुद्रात 17:00 वाजल्यापासून (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सर्व प्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यावर सहमती झाली आहे, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले.
आज दोन्ही बाजूंना या समजुतीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डायरेक्टर्स जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स १२ मे रोजी दुपारी १२:०० वाजता पुन्हा चर्चा करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत दोन्ही देशांमध्ये थेट चर्चा झाली. पाकिस्तानच्या DGMO यांनी आज दुपारी दूरध्वनी करून या चर्चेची सुरुवात केली, त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये समेट झाला. इतर कोणत्याही ठिकाणी इतर कोणत्याही विषयावर चर्चा करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट केले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या संदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधी झाली आहे, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे.”
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज दुपारी 3:35 वाजता भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार 5 वाजतापासून दोन्ही बाजूंकडून जमिनीवर, हवेत आणि समुद्र असा सर्वप्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज, या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. लष्करी ऑपरेशन्स महासंचालक 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील.”. त्यामुळे, भारत आणि पाकिस्तान यांच्या सुरू असलेल्या हल्ल्यांना पूर्णविराम मिळाला आहे. तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती देत दोन्ही देशांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.
“अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मी आनंदाने जाहीर करतो की भारत आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांचा सामंजस्यपणा आणि प्रसंगावधानासाठी अभिनंदन! या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून 3.35 वाजता अधिकृपणे फोन आल्यानंतरच भारताने शस्त्रसंधी निर्णयाची घोषणा केली आहे. त्यामुळे, पाकिस्तान नरमल्यानंतर भारताकडून अधिकृतपणे युद्धविरामची घोषणा करण्यात आली आहे.
