विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील कोलाड रोहा रस्त्यावरील आंबेवाडी गावाच्या रस्त्यालगत महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर असुन तो अनेक दिवसापासून उघड्या स्थितीत आहे. याकडे महावितरण कंपनी डोळेझाक करीत असून या उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे या मार्गाने जाणारे नागरिक तसेच विद्यार्थी वर्ग यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
आंबेवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला झाडाझुडपात महावितरण कंपनीने बसवलेला ट्रान्सफॉर्मर हा अनेक दिवसापासून उघड्या स्थितीत आहे. या उघड्या ट्रान्सफॉर्मरच्या सभोवताली झाडंझुडपं आहेत. जर या ठिकाणी पाऊस पडला तर ओल्या झालेल्या झाडांमुळे शॉक लागून मोठा अनर्थ घडू शकतो. तसेच जवळ रायगड जिल्हा परिषद शाळा आहे. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.
एखादा महिना लाईट बिल भरलं नाही तर विज ग्राहकाची लाईट कट केली जाते. परंतु, उघडी असलेली ट्रान्सफॉर्मरचे झाकण बसविण्यासाठी महावितरण कंपनी कानाडोळा करीत आहे. यामुळे कोणाचा नाहक बळी जाऊ शकतो. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याच्या अगोदर तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा महावितरण कंपनी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल.
-चंद्रकांत लोखंडे,
सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक-आंबेवाडी