गणेश पवार
कर्जत : मौजे पेटारवाडी (ता. कर्जत, जि. रायगड) येथे पोल्ट्री फार्मच्या मागील बाजूस अनधिकृतरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये एलपीजी गॅस भरण्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
चेतन पांडुरंग खडे (३७) आणि हर्षद संतोष कालेकर (२१), दोघेही गुडवण (ता. कर्जत) येथील रहिवासी, यांनी अंजली गॅस एजन्सी (मुरबाड) मार्फत काळाबाजारातून घरगुती सिलेंडर खरेदी करून, कॉम्प्रेसर मशीनद्वारे धोकादायक पद्धतीने रिफिलिंगचे काम सुरू केले होते. या गॅस सिलेंडरची विक्री उच्च दराने करून प्रति सिलेंडर अंदाजे ५०० रुपये नफा मिळविण्यात येत होता.

पुरवठा निरीक्षक रविंद्र पांडुरंग दळवी (कर्जत तहसील कार्यालय) यांना माहिती मिळताच, त्यांनी नेरळ पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान १०,२०,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये १०३ घरगुती सिलेंडर, १०० हून अधिक रिकामे व्यावसायिक सिलेंडर, ६ कॉम्प्रेसर, ७ इलेक्ट्रिक वजनकाटे, स्टिकर बंडल्स, पाईप-रेग्युलेटरसह बोलेरो पिकअप वाहन यांचा समावेश होता.
चेतन पांडुरंग खडे, हर्षद संतोष कालेकर व अंजली गॅस एजन्सी वितरक मुरबाड यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९१/२०२५ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५चे कलम ३, ७ भा.न्या.सं. कलम २८७, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, चेतन खडे व हर्षद कालेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गच्चे करत आहेत. प्राथमिक तपासादरम्यान गॅस एजन्सी वितरकाचाही संबंध समोर आल्यामुळे त्या दिशेनेही चौकशी सुरू आहे.