क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)च्या वतीने उरण म्हातवली येथील माऊली हॉलमध्ये क्रिकेट पंचांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात रायगड जिल्ह्यातील सुमारे ५० पंचांनी सहभाग नोंदवला असून शिबिराचे आयोजन एकूण १०० दिवसांसाठी ऑनलाइन व प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्गाद्वारे होणार आहे.
या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन करण्यासाठी माजी रणजीपटू व बीसीसीआय पंच हर्षद रावले, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच राजन कसबे, क्रिकेट नियमांचे तज्ञ नयन कट्टा उपस्थित होते. शिबिरात एमसीसी क्रिकेट लॉ, तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एकदिवसीय, टी-२० व मल्टी डेज सामन्यांचे नियम, आयसीसीच्या कॅच संबंधित नव्या नियमांचे प्रात्यक्षिक करून सविस्तर माहिती देण्यात आली.
यावर्षी आरडीसीएच्या वतीने सर्व वयोगटांतील मुलामुलींसाठी अंदाजे ३०० सामन्यांचे आयोजन करण्यात आले. त्याशिवाय, १६ वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील १५ दोनदिवसीय सामने रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते, ज्यासाठी प्रशिक्षित पंचांनी मोलाचे योगदान दिले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेट पॅनल परीक्षा २०२४ मध्ये यशस्वी ठरलेल्या आठ पंचांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमास आरडीसीएचे उपाध्यक्ष राजेश पाटील, डी. के. भोईर, व ॲड. पंकज पंडित उपस्थित होते.
शिबिरासाठी माऊली हॉल विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल डी. के. भोईर यांचे आभार संस्थेतर्फे मानण्यात आले. अधिकाधिक प्रशिक्षित पंच घडविण्याच्या उद्देशाने आरडीसीए सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदिप नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.