विनायक पाटील
पेण : गरीब आणि गरजू रुग्णांसाठी दिलासा ठरलेल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, मुंबई व बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या उपक्रमामुळे पेण तालुक्यातील अनेकांना दृष्टीविकृतीवर मोफत उपचार मिळाले.

या शिबिरात एकूण १७० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६३ जणांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले असून ३६ रुग्णांना ऑपरेशनसाठी वडाळा, मुंबई येथील संस्थेत हलवण्यात आले. या उपचारासाठी वाहतूक, निवास आणि भोजनाचीही सोय निःशुल्क होती. शिबिराच्या ठिकाणी कॉम्प्युटराइज्ड दृष्टी चाचणी, नेत्रदाब तपासणी, शुगर आणि बीपी मोजणी, डायबेटीस रेटीनोपॅथी परीक्षण आणि चष्म्याचा नंबर तपासणी अशा अनेक सुविधा उपलब्ध होत्या.
शिबिराच्या यशस्वी आयोजनात प्रशांत नाईक, निकिता पाटील, अमेय म्हात्रे, कोमल आव्हाड यांच्यासह संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. आयोजनासाठी लीना बाफना, नितीन पाटील, कृषभ जैन, कृतिक जैन, दीपक शाह, महेंद्रशेठ बाफना, रणजित बाफना, पत्रकार विजय मोकल यांनी पुढाकार घेतला.
शिबिराच्या यशाबद्दल बोलताना रमाकांत पाटील यांनी सांगितले की, “बाफना फाउंडेशनने याआधीही अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. अशा कार्यामुळे गरजूंना आधार मिळतो.”
आगामी काळात पेण तालुक्यात वेगवेगळ्या भागांत अशी शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशांत नाईक यांनी दिली असून नागरिकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.