अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबागहून पनवेलकडे जाणारी विनावाहक शिवशाही बस ट्रकला पाठीमागून धडकल्यामुळे जिते गावाजवळ अपघात झाला. हा अपघात बुधवार, २५ जून रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडला.
एमएच-०६ बीडब्ल्यू-४३७३ क्रमांकाच्या शिवशाही बसने सकाळी ६:४५ वाजता अलिबाग बसस्थानकातून प्रवास सुरू केला होता. बसमध्ये एकूण २० प्रवासी होते. धडक झाल्यामुळे काही प्रवासी किरकोळ जखमी झाले, तर काहींना मुका मार लागला असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे.
अपघातानंतर बसचा दरवाजा अडकल्यामुळे प्रवाशांना चालकाच्या बाजूने बाहेर काढावे लागले. त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये त्यांना बसवून प्रवास सुरु करण्यात आला.
या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.