• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नागोठणेत जनजागृती कार्यशाळा

ByEditor

Jun 28, 2025

नितीन गायकवाड
नागोठणे :
दिनांक 26 जून 2025 रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत शांतिबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथे जनजागृतीसाठी विशेष कार्यशाळा व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 1.30 ते 2.40 या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सुमारे 200 ते 250 सहभागींनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांबाबत मूलभूत माहिती देण्यात आली. मार्गदर्शनात अंमली पदार्थ म्हणजे काय?, त्याचे प्रकार कोणते?, सेवनामुळे होणारे शरीरावर व मनावर परिणाम, अशी परिस्थिती टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विरोधात शपथही देण्यात आली, ज्यामुळे सामाजिक भान अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला गेला.

या उपक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर, सपोनि सचिन कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, पो.कॉ. स्वप्नील भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे संचालक किशोर जैन व प्राचार्य ज्योती मॅडम यांनी कार्यक्रमाचे संयोजन व सहकार्य केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करून, त्यांच्यातील सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत करणारा ठरला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!