मुंबई-श्रीवर्धन एसटीचे एक्सल निखळताना थांबले; ग्रामस्थांच्या दक्षतेने अपघात टळला
श्रीवर्धन आगाराला नादुरुस्त गाड्यांची भर
गणेश प्रभाळे
दिघी : रायगड एसटी महामंडळाकडून श्रीवर्धन तालुक्यासाठी रोहा डेपोची गाडी देण्यात आली आहे. मात्र, या नादुरुस्त एसटीमुळे अपघात अपघात होता होता वाचला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेने प्रवाशांची मोठी दुर्घटना टळली आहे.
श्रीवर्धन डेपोसाठी रोहा येथून आलेली MH 13 CU 6896 क्रमांकाची एसटी शनिवारी सकाळी सहा वाजता प्रवाशांना घेऊन मुंबईहून श्रीवर्धनकडे सुटली. मात्र, या प्रवासात गाडीच्या मागच्या बाजूस दोन चाकांना जोडणाऱ्या एक्सलचे एका बाजूचे नटबोल्ड पडून गेले. एक्सल पार्टवर असणाऱ्या आठ नटबोल्ड पैकी फक्त तीनच नट होते. ते सुद्धा निघण्याच्या अवस्थेत असताना खिळखिळ आवाज करत गाडी बोर्लीपंचतन पोहचली.
गाडीतून येणाऱ्या आवाजामुळे बोर्ली बसस्थानक परिसरात धवल तवसाळकर, सागर इंगळे, विजय कांबळे आदी ग्रामस्थांनी एसटी जागेवरच थांबवली. चालक व बसस्थानक व्यवस्थापक प्रसाद मोरे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. या गाडीने पुढे नानवलीकडे जाणारा घाट रस्त्यातून प्रवास धोकादायक ठरला असता, तात्काळ प्रवाशांना उतरवून दुसऱ्या गाडीची सोय केल्याने पुढील अनर्थ टळला. श्रीवर्धन आगाराला नादुरुस्त गाड्यांचे ग्रहण लागले आहे. खराब बसेस प्रवासात बंद पडण्याच्या घटना अधून मधून घडत असतात. यामुळे प्रवाशांत संताप व्यक्त केला जात आहे.
रोहा आगारातील एसटी श्रीवर्धनकडे आल्या आहेत. प्रवासासाठी सर्व वाहनांची तपासणी करून सोडण्यात येतील.
-महेबुब मनेर,
आगार प्रमुख, श्रीवर्धन.