• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

करळ फाटा परिसरात व्यसनींचा धुमाकूळ; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

ByEditor

Jun 29, 2025

विठ्ठल ममताबादे
उरण:
करळ फाटा येथील जेएनपीटीच्या सर्व्हिस रोडलगत दारू व अंमली पदार्थांचे खुलेआम सेवन होत असल्यामुळे परिसरातील वातावरण असुरक्षित झाले आहे. महिलांचा सुरक्षित प्रवास धोक्यात आला असून ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

सार्वजनिक ठिकाणी व्यसनाधीनांची दादागिरी

संध्याकाळच्या वेळेस या रस्त्यालगत व्यसनींचे टोळके जमून दारू, गांजा, चरस यांचे खुलेआम सेवन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या भागातून शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा सतत वावर असून त्यांना अपमानास्पद व धोकादायक प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.

प्रशासनाकडून दुर्लक्ष?

ग्रामस्थांच्या मते, या प्रकारावर प्रशासनाकडून कोणतीही ठोस किंवा कायमस्वरूपी कारवाई होत नसल्यामुळे या व्यसनी लोकांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे भविष्यात गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

महिलांचा रोष; प्रशासनाला निवेदन

सोनारी ग्राम सुधारणा मंडळ, पंच कमिटी आणि महिला मंडळ यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मोर्चा काढून जेएनपीटी प्रशासन आणि न्हावा शेवा पोलीस ठाण्याला निवेदन दिले. त्यांनी रस्त्यालगत व्यसनाधीन व्यक्तींवर तातडीने व ठोस कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

गावकरी म्हणतात:

“कोणालाही रोजी-रोटीवर आमचा आक्षेप नाही, मात्र सार्वजनिक रस्त्यांवर व्यसन करणे समाजाच्या प्रतिष्ठेस धक्का आहे. महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा विषय गंभीर असून याकडे दुर्लक्ष केल्यास परिणाम गंभीर होतील,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!