मुंबई : शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात उभ्या ठाकरे बंधूंना मोठा यश लाभलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित दोन्ही शासन आदेश मागे घेतल्याची घोषणा करताच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ठाकरे गटाकडून जल्लोषाला सुरुवात झाली.
दोन्ही पक्षांनी ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र शासनाने आदेश मागे घेतल्याने आता ‘विजयी जल्लोष मेळावा’ म्हणून हा कार्यक्रम वरळीतील डोममध्ये होणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला एक संयुक्त पत्र लिहून त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. “सरकारला नमवलं का? हो, नमवलं! आणि कोणी? तर मराठी जनतेने!” अशा शब्दांत त्यांनी जनतेचा गौरव केला आहे. “आम्ही फक्त आयोजक आहोत; जल्लोष तुमचाच आहे,” असंही त्यांनी नमूद केलं आहे.
राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी हे पत्र ‘जय महाराष्ट्र’ या कॅप्शनसह आपल्या एक्स (पूर्वीचं ट्विटर) खात्यावर शेअर केलं असून ते सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पत्राच्या शेवटी, “वाजत-गाजत या, गुलाल उधळत या! आम्ही वाट पाहतोय…” असा जल्लोषमय संदेश आहे, ज्यावर “आपले नम्र — राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे” अशी सहस्वाक्षरी आहे.
संताक्रुजमधील ग्रँड हयात हॉटेलमध्ये मनसेचे बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांची भेट झाली. यावेळी विजयी मेळाव्याची आखणी, ठिकाण व वेळ यावर सविस्तर चर्चा झाली.
कार्यक्रमात प्रमुख पक्षनेत्यांची भाषणे होण्याची शक्यता आहे — ज्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार गटाचे नेते आणि काँग्रेसचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.
