मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी आमदार निवासात वास्तव्यास असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्याकडून मंगळवारी रात्री मोठा राडा झाला. कन्टीनमध्ये मिळालेल्या निकृष्ट जेवणामुळे त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली, असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या जेवणात मिळालेली डाळ खराब असल्याने आमदार गायकवाड संतप्त झाले. त्यांनी कन्टीन व्यवस्थापकाला बोलावून डाळीचा वास घ्यायला लावला, आणि त्यानेही डाळ निकृष्ट असल्याचं मान्य केल्याचं व्हिडीओत स्पष्टपणे दिसून येतं.
यानंतर गायकवाड यांनी कर्मचाऱ्यावर हात उचलल्याची माहिती आहे. उपस्थितांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी ते न थांबता रागाने प्रतिक्रिया देत राहिले. त्यांनी संबंधित डाळ फूड डिपार्टमेंटकडे तपासासाठी पाठवण्याचे निर्देशही दिले.
हा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी कॅन्टीनच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली आहे, तर काहींनी गायकवाड यांची कृती अमानवी असल्याची टीका केली आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या आजच्या बैठकीत संजय गायकवाड जेवणाच्या दर्जाचा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती मिळत आहे.