सलीम शेख
माणगाव : माणगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावर एमआरएफ टायर शोरूमजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सदरचा अपघात दि. ४ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद प्रियंका प्रदीप सोनावळे (वय-२८) रा. नाणोरे ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, अपघाताची फिर्याद देणारी प्रियंका प्रदीप सोनावळे यांचे वडील मयत प्रदीप सुंदर सोनावळे (वय ५७) रा. नाणोरे ता. माणगाव हे दुपारचे जेवण करून तहसील कार्यालय माणगाव येथे स्वतःच्या मालकीची स्प्लेंडर कंपनीची मोटार सायकल क्र. एम. एच. ०६ सी. एच. ५३८० या गाडीने ड्युटीवर जात असताना माणगावात एमआरएफ टायर शोरूमजवळ त्यांची गाडी आल्यावर अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाची मोटार सायकलला धडक लागून अपघात घडला. या अपघातात मोटार सायकलस्वार प्रदीप सुंदर सोनावळे यांना गंभीर दुखापती होऊन त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं. २६१/ २०२३ भादंवि संहिता कलम ३०४ अ , २७९, ३३७,३३८, मोटार वाहन अधिनियम १८४, १३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री गायकवाड हे करीत आहेत.