माजी सैनिकांनी विद्यार्थ्यांना दिले पटवून आर्मी भरतीचे महत्व
किरण लाड
नागोठणे : येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘मेरी माटी मेरा देश’ अभियाना अंतर्गत विभागातील माजी सैनिकांच्या सत्काराचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते.
यावेळी मातृभूमीच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून अहोरात्र सेवा करणारे देशाचे माजी सैनिक सेवानिवृत्त हवालदार उदय पवार, तसेच सेवानिवृत्त हवालदार गणेश जाधव यांचा सत्कार महाविद्यालयातर्फे करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना माजी सैनिकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, तुम्ही आर्मी भरतीसाठी उच्च दर्जाची तयारी करुन देशाचे सैनिक म्हणुन भरती व्हा आणि भारत मातेची सेवा करा हेच तुमच्या आयुष्याचे ध्येय ठेवा. म्हणजे तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. माजी सैनिकांचे समाजातील स्थान फार मोठे आहे. तसेच माजी सैनिकांना निवृत्तीनंतर शासनाच्या सेवेत काम करण्याची संधी मिळते.

प्राचार्य डाॅ. संदेश गुरव यांनी त्यांचे वडील आर्मीमध्ये सेवेत असताना त्यांना आलेले अनुभव विद्यार्थ्यांना कथन केले. यावेळी रसायनशास्त्राचे प्रमुख प्रा. डाॅ. दिनेश भगत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डाॅ. श्रीकृष्ण तुपारे तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विकास शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयीन प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.