अमूलकुमार जैन
रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने काल सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलिस स्टेशन हद्दीतील भाताण बोगद्याजवळ हा अपघात घडला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सौरभ नितीन शिंदे यांचा टेम्पो (एमएच १२ बीएफ ७२२८) मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना रस्ता घसरल्यामुळे पलटी झाला. त्याच वेळी आयशर टेम्पो (एमएच ४६ बीएम ३२७३) ने पुढे असलेल्या अज्ञात वाहनास जोरदार धडक दिली. यामुळे पाठीमागून येणाऱ्या सुनील चक्रवती यांच्या ट्रॅव्हल्स बसने (एमएच ०१ ईडब्ल्यू ३२०१) अचानक ब्रेक दाबल्यामुळे तिसऱ्या लेनच्या भिंतीला जोरदार धडक दिली व आडवी झाली. याच वेळी डी डी ०१ एक्स ९७३० क्रमांकाच्या दुसऱ्या ट्रॅव्हल्स बसने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने अपघात अधिक गंभीर झाला.
या दुर्घटनेत परशुराम दत्तात्रय हेगडे (कोल्हापूर), लियाकत नालबंद, दिपक गावकर आणि क्रेन मदतनीस अनिल ढाकणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एकूण सहा वाहने अपघातग्रस्त झाली असून त्या वाहनांना बाजूला करून एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. बोरघाट परिसरात पावसाळ्यात वारंवार अपघात होत असल्याने आयआरबी यंत्रणेकडून रस्त्यावरील निसरडेपणावर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.