• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

“जसा राजा, तशी प्रजा! सगळे गुंडे!… सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टनंतर आव्हाडांच्या लेकीचा संताप

ByEditor

Jul 18, 2025

मुंबई : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद आता अधिक तीव्र झाला असून, त्याचे पडसाद विधानभवनाच्या आवारातही उमटले. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी जोरदार मारामारी झाली. या घटनेमुळे विधिमंडळाच्या सन्मानाला धक्का बसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. विधानभवनाच्या तळमजल्यावर सायंकाळी सुमारे ५.३० वाजता आव्हाड समर्थक नितीन देशमुख आणि पडळकर समर्थक ऋषिकेश ऊर्फ सर्जेराव टकले यांच्यात वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांमध्ये शिवीगाळ, धक्काबुक्की आणि कपडे फाटण्याची वेळ आली. उपस्थित सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोघांना बाजूला केले. यावेळी हा सगळा प्रकार मोबाईलवर रेकॉर्ड झाला.

या घटनेनंतर आणखी एक मोठा वाद निर्माण झाला, सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीबाबत करण्यात आलेल्या अश्लील आणि खालच्या पातळीवरील पोस्टमुळे. नताशा आव्हाड हिने स्वतः ट्विटर/X वर अशा एका पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. तिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना टॅग करत लिहिले:

“जसा राजा, तशी प्रजा! सगळे गुंडे. माझी या प्रकरणात कोणतीही भूमिका नाही, तरीही या नीच लोकांकडून मला यात ओढले जात आहे. @Dev_Fadnavis @MumbaiPolice तुम्ही फक्त मजा पाहत राहा!”

या पोस्टमध्ये नताशा आव्हाड यांच्यावर अत्यंत अपमानकारक आणि धार्मिक विद्वेष वाढवणारे आरोप करण्यात आले आहेत. त्या पोस्टमध्ये असे लिहले होते की – “ज्याच्या पोरीने #मंगळसूत्र घालणारा न निवडता इतरधर्मीय निवडला तो आता मंगळसूत्राच्या नावाने बोंबलतोय! बेटी*** *** कॉकटेल फॅमिलीचा पाळीव कुत्रा…” — ही पोस्ट आक्षेपार्ह भाषेचा उपयोग करत आव्हाड कुटुंबावर वैयक्तिक हल्ला करते.

वादाची पार्श्वभूमी

या सगळ्याची सुरुवात गेल्या आठवड्यात विधानभवनात झाली, जेव्हा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना ‘मंगळसूत्र चोर’ असं म्हणत सुनावलं. त्यानंतर बुधवारी पडळकर यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आव्हाड यांना शिवीगाळ केली. हे वादच पुढे त्यांच्या समर्थकांमधील झटापटीत रूपांतरित झाले.

टकलेचा गुन्हेगारी इतिहास

या प्रकरणातील पडळकर समर्थक ऋषिकेश टकले उर्फ सर्जेराव टकले याच्यावर 2016 ते 2021 दरम्यान सहा गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्यावर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाईही करण्यात आली आहे. तो सध्या ‘शिव मल्हार क्रांती सेना’चा सांगली जिल्हाध्यक्ष आहे.

आव्हाड आणि जयंत पाटील यांनी विधानसभाध्यक्षांकडे तक्रार केली आहे की हल्लेखोर टकलेला पोलिसांनी तंबाखू मळून दिला. यावर विधानसभा प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!