मुंबई, ता. १८ जुलै (प्रतिनिधी): गेल्या गुरुवारी विधानभवन परिसरात झालेल्या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा गंभीर पडसाद सभागृहात उमटला असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकाराला ‘अत्यंत गंभीर’ ठरवत कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी जोरदार राडा झाला होता. हाणामारी इतकी टोकाची होती की काही कार्यकर्त्यांचे कपडेही फाटले. बुधवारी झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूप गुरुवारी थेट शारीरिक झटापटीत झाले. या प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली होती.
विधानभवन परिसरात प्रवेश मर्यादित
अधिवेशनाच्या कालावधीत सदस्य, त्यांच्या अधिकृत सहाय्यक व अधिकारी यांनाच प्रवेश देण्यात येणार असून, इतर कोणत्याही अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही. मंत्र्यांनी ब्रिफिंगसाठी मंत्रालयातच बैठक घेण्याचा स्पष्ट आदेशही दिला आहे.
नीतीमूल्य समिती स्थापन करण्याचा विचार
विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी हे प्रकरण विधीमंडळाच्या उच्च परंपरेला धक्का देणारे असून, त्यावर खासगी सदस्य नीतीमूल्य समिती स्थापन करण्याचा विचार सुरु असल्याचे सांगितले. आठवड्याभरात यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे.
वर्तनावरील कारवाई: विशेषाधिकार समितीकडे प्रकरण
नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांच्या वर्तनामुळे सभागृहाच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याने हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्याची घोषणा करण्यात आली. तसेच जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांनी अभ्यागतांना विधानभवनात आणल्याबद्दल सभागृहात खेद व्यक्त करावा, असे आदेशही अध्यक्षांनी दिले.
