मुंबई, ता. १८ जुलै (प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहराचे नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, आता इस्लामपूरचे नवीन नाव ‘ईश्वरपूर’ असे करण्यात आले आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती जाहीर केली.
हे नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, हिंदुत्ववादी संघटना व स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल राज्य सरकारने घेतली आहे.
या आधीही राज्यात शहरांची नावे बदलण्याचे निर्णय घेण्यात आले होते. औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ तर अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे ठेवण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील शहराच्या ओळखीमध्ये ऐतिहासिक बदल झाला असून, याबाबतची प्रतिक्रिया सामाजिक व राजकीय स्तरावर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
