अमूलकुमार जैन
नवी मुंबई : उलवे परिसरात एका तरुणाने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंधात अडकवले आणि वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केले. त्यानंतर जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडत धमकी दिल्याप्रकरणी उलवे पोलिस ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मोहित वीरेंद्र सिंग (वय ३०) व पीडित महिला यांची ओळख फेब्रुवारी २०२५ मध्ये झाली. मैत्री वाढवत लग्नाचे आमिष दाखवत मोहितने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. महिला गर्भवती राहिल्याचे समजताच आरोपीने ओळखीच्या मेडिकल स्टोअरमधून गर्भपाताच्या गोळ्या आणून जबरदस्तीने तिच्यावर गर्भपात केला. गर्भपातामुळे ती गंभीर अवस्थेत असताना आरोपीने छायाचित्र व व्हिडिओ तयार करून पुन्हा लग्नाचे आमिष देत तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केला.
या दरम्यान आरोपीने फसवणुकीने प्रतिज्ञापत्र तयार करून संरक्षण घेण्याचा प्रयत्न केला. तक्रार दाखल करताच मोहितने ‘आता तुझं काही चालणार नाही’ म्हणत धमकी देऊन फरार झाला.
पीडित महिला आरोपी मोहितच्या घरात राहात असताना दुसरा आरोपी आकाश यादवने तिच्याशी अश्लील वर्तन करत लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल असून तो फरार आहे.
आरोपी मोहितला न्यायालयात हजर केल्यावर त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक राजाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिस सूत्रांनी पीडितेस आवश्यक ती मदत दिली जात असल्याचे सांगितले.