मुंबई : लातूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतील गोंधळ आणि छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना पक्षाकडून मोठा दणका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सूरज चव्हाण यांना तातडीने पदाचा राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
“काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायला सांगितले आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली. पक्षाच्या मूल्यांविरुद्ध जाणाऱ्या वर्तनाला कोणतीही मुभा दिली जाणार नाही, यासाठीच हा कठोर निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या प्रतिमेवर ओरखडा टाळण्यासाठी निर्णय
लातूरमधील वादामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचे सांगत अजित पवार यांनी ही तातडीची कारवाई केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकारची हिंसा, असभ्य भाषा किंवा असंसदीय वर्तन पक्षात सहन केले जाणार नाही.
लोकशाही मार्गावर चालण्याचा सल्ला
या घटनेवर नाराजी व्यक्त करताना अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत समज दिली. “माझ्या सर्व सहकाऱ्यांनी सामाजिक जीवनात काम करताना लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मूल्यांना नेहमी प्राधान्य द्यावे,” असा सल्ला त्यांनी दिला.
“समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्या आणि भावना आम्ही मनापासून सन्मानित करतो,” असेही ते म्हणाले. या घटनेनंतर पक्षातील शिस्तबद्धता आणि नैतिकतेचा आग्रह अजित पवार यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.