मुंबई : राज्यात गाजत असलेल्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत मोठं वक्तव्य केलं आहे. “हनी ट्रॅप नाही, असं विधानसभेत सांगणाऱ्या फडणवीसांनी या एका फोटोची सीबीआय चौकशी करावी, सत्य बाहेर येईल,” असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना खुले आव्हान दिलं आहे.
आज (21 जुलै) संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट करत गिरीश महाजन आणि आणखी एका व्यक्तीचे छायाचित्र प्रसिद्ध केलं. याच फोटोचा संदर्भ देत त्यांनी गंभीर आरोप केले.
“चार तरुण खासदार हनी ट्रॅपमुळेच पळाले” – संजय राऊतांचा दावा
संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत दिशाभूल करत आहेत. राज्यात हनी ट्रॅप नाही, असं ते म्हणाले. मात्र या एकाच फोटोच्या सीबीआय चौकशीत अनेक मंत्री, अधिकारी, आणि शिवसेनेतून फुटलेले चार तरुण खासदार यांचा संबंध समोर येईल. दूध का दूध, पानी का पानी होईल.”
राऊतांनी आरोप केला की, “हनी ट्रॅपची सुरुवात दिल्लीतून झाली आणि त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर झाला. हनी ट्रॅपच्या माध्यमातून १६-१७ आमदार आणि ४ खासदारांना भाजपाने आपल्या बाजूने वळवलं. त्यांना व्हिडिओ आणि सीडी दाखवण्यात आल्या. यामागे ईडी, सीबीआयचा वेगळा रोल होता.”
तसेच, “हनी ट्रॅपचा सूत्रधार सध्या मंत्रिमंडळात आहे,” असा थेट आरोप करत राऊतांनी म्हटलं की, “विजय वडेट्टीवार यांनी थोडी माहिती उघड केली आहे, पण लवकरच मी संपूर्ण माहिती देणार आहे.”
फडणवीसांचे स्पष्टीकरण – “ना हनी आहे, ना ट्रॅप”
दरम्यान, या प्रकरणावर विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली होती. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हनी ट्रॅपचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करत काही मंत्री अडकले असल्याचा दावा केला. त्यावर फडणवीस म्हणाले, “ना हनी आहे, ना ट्रॅप. राज्यात अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. ना तक्रार आहे, ना पुरावा.”
फडणवीस म्हणाले, “नाना पटोले यांचा हनी बॉम्ब आम्हाला अजून मिळालेला नाही. असला तर त्यांनी तो द्यावा.” त्यांनी यासंदर्भात कोणतीही पुष्टी न झाल्याचे स्पष्ट केले.
तसेच, या चर्चेमुळे सध्या आजी-माजी मंत्र्यांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झाल्याचं फडणवीस म्हणाले. “नाशिकमधून अशा स्वरूपाची एकच तक्रार आली होती, त्याशिवाय कुठलाही ठोस पुरावा नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.