वृत्तसंस्था
मुंबई : कोचीहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI-2744 ला आज सकाळी लँडिंगदरम्यान अपघाताचा धोका निर्माण झाला. मुंबई विमानतळावर उतरताना विमानाचे तीन टायर फुटल्याने आणि ते धावपट्टीवरून घसरल्याने क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, विमान लँडिंग करताना रनवेच्या पुढे गेले. यामुळे विमानाचे इंजिनही मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाल्याची माहिती आहे. इंजिनीअरिंग विभागाकडून विमानाची सखोल पाहणी सुरू असून, हवामानाची स्थिती आणि यंत्रणा बिघाडाचा तपास सुरु आहे.
घटनेनंतर काही वेळ मुंबई विमानतळावरील उड्डाण आणि आगमनाचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. मात्र, विमान सुरक्षितपणे गेटवर पोहोचले असून, सर्व प्रवासी व क्रू सदस्य सुखरूप असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) पथक मुंबईत दाखल झाले असून, संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला जात आहे.
“प्रवाशांची व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
