अंबरनाथ : स्मार्टफोन आणि हेडफोनच्या सततच्या वापरामुळे तरुणाईचं लक्ष विचलित होतंय आणि त्यामुळे जीवावर बेतणाऱ्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. अंबरनाथ येथे घडलेली एक हृदयद्रावक घटना याचं ताजं उदाहरण ठरली आहे. फोनवर बोलत, हेडफोन कानात घालून रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला, तर तिला वाचवण्यासाठी धावलेला तरुणही रेल्वेखाली चिरडून मृत्युमुखी पडला.
ही दुर्घटना २० जुलै रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास, अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळ बी केबीन रोडजवळ घडली. मृत महिला वैशाली सुनील धोत्रे (वय ४५, रा. मोरीवली गाव) आणि तरुणाचे नाव आतिष रमेश आंबेकर (वय २९, रा. महालक्ष्मी नगर, अंबरनाथ) असे आहे. दोघेही आनंदनगर एमआयडीसीतील एका कंपनीत सहकारी म्हणून काम करत होते.
घटनेच्या दिवशी कामावरून घरी परतताना, आतिष हे वैशाली यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी मोरीवली गावाजवळ गेले होते. याच दरम्यान, वैशाली या फोनवर बोलत, हेडफोन कानात घालून रेल्वे रुळ ओलांडत होत्या. त्याच क्षणी समोरून रेल्वे आली. आजूबाजूच्या लोकांनी आणि आतिषने त्यांना आवाज दिला, पण हेडफोनमुळे आवाज ऐकू न आल्याने त्या पुढे जात राहिल्या.
प्रयत्न करूनही वेळ निघून गेली. आतिष तातडीने त्यांना वाचवण्यासाठी धावला, पण तोपर्यंत दोघेही ट्रेनच्या धडकेत गंभीर जखमी झाले आणि काही क्षणांतच मृत्यू पावले.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
आतिष हा आपल्या वृद्ध आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या दोन मोठ्या बहिणींची लग्नं झाली असून त्यांचं संपूर्ण कुटुंब त्याच्यावर अवलंबून होतं. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबात शोककळा पसरली आहे.
तर वैशाली यांच्या पश्चात् त्यांना २२ वर्षांचा मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या पती रिक्षाचालक असून सध्या त्यांच्या मुलीचं लग्न ठरलेलं होतं. घरात आनंदाच्या तयारीचं वातावरण असतानाच या अपघाताने कुटुंबाचा आधारच हरपला आहे.
पादचारी पूल उभारण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर
ही घटना घडल्यानंतर मोरीवली गाव ते बी केबीन रोडदरम्यान पादचारी पूल उभारावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गावाचे माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी यापूर्वीही यासाठी पादचारी पूल व उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती.
“रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यावर जागं होणार?” असा थेट सवाल भागवत यांनी उपस्थित केला आहे.