मुंबई : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी मंत्रालय काढून घेण्याच्या हालचालींना वेग आला असून, लवकरच त्यांचं खाते बदलले जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जागी मकरंद पाटील यांच्याकडे कृषी खाते दिलं जाणार असून, मदत व पुनर्वसन विभाग माणिकराव कोकाटे यांच्याकडे दिला जाण्याचे संकेत आहेत.
हा खातेबदल मंत्रिपद काढून न घेता नाराजी शमवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. पक्षांतर्गत व विरोधकांमधील वाढती नाराजी लक्षात घेता, कोकाटे यांच्यावर कारवाई टाळून सौम्य तोडगा काढण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून हा निर्णय घेतला जात असल्याची शक्यता आहे.
वादग्रस्त वर्तन आणि विधानांचा परिणाम
माणिकराव कोकाटे यांच्यावर अलीकडच्या काही महिन्यांत विधान परिषदेत रमी खेळणे, तसेच शेतकऱ्यांबाबत वारंवार वादग्रस्त विधानं केल्यामुळे सरकार आणि पक्षातील वरिष्ठ नेतेही अडचणीत आले होते. त्यांचं अशा पद्धतीचं वर्तन हे संपूर्ण सरकारच्या प्रतिमेला धक्का देणारे असल्याचं गृहित धरलं जात होतं.
तसंच, न्यायालयीन प्रकरणात फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर देखील कोकाटेंच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील काही वरिष्ठ नेत्यांनी कोकाटेंचं संपूर्ण मंत्रिपद काढून घेणं हे अति वाटेल असं मत व्यक्त केल्याचंही समजतंय. ते पहिल्यांदाच मंत्री झाल्याने त्यांना एक संधी देणं आवश्यक आहे, असंही पक्षांतर्गत चर्चेतून समोर आलं आहे.
म्हणूनच थेट राजीनामा न घेता त्यांचं खाते बदलून राजकीय संदेशही दिला जाईल आणि अंतर्गत असंतोषही थांबवता येईल, असा गणिती विचार सत्ताधारी गटांनी केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.