मुंबई : राज्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीपुढे थकीत वीज देयकांमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने १५ जुलैपासून नवा नियम लागू केला असून, त्यानुसार दोन महिने सलग वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची थकबाकी तिसऱ्या महिन्यात थेट त्यांच्या सुरक्षा ठेवेतून वळती केली जाणार आहे.
काय आहे नवा नियम?
नवीन प्रणालीनुसार, जर ग्राहकाने सलग दोन महिने वीजबिल न भरले, तर तिसऱ्या महिन्यात कंपनी महावितरणकडे जमा असलेल्या सुरक्षा ठेवीतून थकीत रक्कम वळती करेल. यानंतर ग्राहकाला ही वापरलेली सुरक्षा ठेव आणि उर्वरित थकबाकी भरावी लागेल. तोपर्यंत वीजपुरवठा सुरू ठेवण्यात येणार नाही.
तसेच, ज्या ग्राहकांनी पूर्वी वाढीव वीज वापरानुसार महावितरणकडे सुरक्षा ठेव भरलेली नसेल, त्यांना ती संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे, आणि त्यानंतरच त्यांच्या नावावरील बाकी देयक स्वीकारले जाणार आहे.
वीज जोडणीसाठी नवीन अट
जर ग्राहकाने वरीलप्रमाणे देयक भरले नाही, तर त्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल. पुढे तो वीजपुरवठा सुरू करण्यासाठी ग्राहकाने:
- जुन्या सुरक्षा ठेव रकमेची भरपाई
- संपूर्ण थकीत वीज देयक
- वीज जोडणी शुल्क
या तिन्ही गोष्टी भरल्या शिवाय सेवा पूर्ववत केली जाणार नाही.
पूर्वीची कारवाई पद्धत काय होती?
यापूर्वी, दोन महिने वीजबिल थकवल्यानंतर महावितरणकडून तिसऱ्या महिन्यात ग्राहकाला १५ दिवसांची नोटीस दिली जात होती. त्यानंतरही बिल न भरल्यास वीज पुरवठा तात्पुरता खंडित केला जात असे. मात्र, तेव्हा सुरक्षा ठेवीतील रक्कम वळती केली जात नव्हती. ती फक्त वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाल्यानंतरच वापरली जात असे.
आता लागू करण्यात आलेल्या नव्या प्रणालीमुळे थकबाकीदार ग्राहकांवर नियंत्रण आणणे आणि महावितरणच्या आर्थिक अडचणी काही अंशी दूर होण्याची अपेक्षा आहे. मात्र, नियमित वीजबिल न भरणाऱ्या आणि सुरक्षा ठेव भरलेली नसलेल्या ग्राहकांना मोठा आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे.