पालघर (प्रतिनिधी) – पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर लागणाऱ्या गुजराती भाषेतील पाट्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. हालोली परिसरातील हॉटेलांवर लावलेल्या गुजराती पाट्यांची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली असून, अनेक ठिकाणांहून या पाट्या हटवण्यात आल्या आहेत.
घोडबंदर ते अच्छाड दरम्यानच्या महामार्गावर अनेक हॉटेल, दुकाने आणि व्यावसायिक स्थळांवर गुजराती भाषेतील पाट्या प्रामुख्याने लावण्यात आल्या होत्या. या भागात प्रवेश करताना आपण महाराष्ट्रात आहोत की गुजरातमध्ये, असा संभ्रम निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याविरोधात झी २४ तास या वृत्तवाहिनीने आवाज उठवल्यानंतर मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
मनसेच्या आंदोलनानंतर काही हॉटेल मालकांनी स्वयंप्रेरणेने गुजराती पाट्या हटवल्या, तर काहींना मनसे कार्यकर्त्यांनी थेट इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी पाट्यांची तोडफोड करण्यात आली असून, मराठी पाट्यांची अनुपस्थिती हा मुख्य आक्षेप असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत म्हटलं की, “राज ठाकरे यांनी पूर्वीही म्हटलं होतं की पालघर ते मुंबईदरम्यान गुजरातमधील व्यापारी मोठ्या प्रमाणात जागा खरेदी करत आहेत आणि हा भाग गुजरातमधीलच भासत आहे. पाट्यांबाबत कायदे आहेत, दंडही आहे, पण अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष का होते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, “एकीकडे मराठी पाट्यांची सक्ती केली जाते आणि दुसरीकडे गुजराती पाट्या सर्रास लावल्या जातात, हे दुटप्पी धोरण कसे चालेल?”.
दरम्यान, या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर मराठी अस्मिता व भाषिक असंतोषाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुढील काळात पालघरमधील हॉटेल, दुकानांवर मराठी पाट्या लावल्या जातात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
