मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत असून, महायुती सरकारमधील ८ वादग्रस्त आणि काही वरिष्ठ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातील काही मंत्र्यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जनतेमध्ये सरकारबाबत वाढती नाराजी आणि काही मंत्र्यांच्या वादग्रस्त वागणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल महत्त्वाचा ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतरही, सरकार स्थापन झाल्यानंतर काही मंत्र्यांचे वर्तन आणि निष्क्रिय कार्यकाळ जनतेमध्ये चुकीचा संदेश देणारे ठरल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्याचे समजते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषित केलेल्या ‘१०० दिवसांच्या कार्ययोजनेत अनेक मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नव्हती. परिणामी, नव्या चेहऱ्यांना संधी देत मंत्रिमंडळात ताजं रक्त आणण्याची तयारी सुरू आहे.
सूत्रांनुसार, संजय शिरसाट (सामाजिक न्याय), भरत गोगावले (रोहयो), दादा भुसे (शिक्षण), योगेश कदम (गृहराज्य), माणिकराव कोकाटे (कृषी), नरहरी झिरवळ, नितेश राणे (मत्स्यविकास), जयकुमार गोरे (ग्रामविकास) ह्या मंत्र्यांची नावे ‘हिटलिस्ट’वर असल्याची जोरदार चर्चा आहे: या मंत्र्यांपैकी अनेकजण वादग्रस्त विधानं, प्रशासकीय अकार्यक्षमता किंवा जनतेतील नाराजीमुळे चर्चेत राहिले आहेत.
भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनाही पक्षाच्या अंतर्गत गरजांमुळे काही काळ मंत्रिमंडळाबाहेर राहावं लागू शकतं, अशी शक्यता आहे.
दुसऱ्या बाजूला, मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येण्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते, तर नाराज असलेले सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षपद देऊन समाधान दिलं जाऊ शकतं.