मुंबई : साप पकडून नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना आता सरकारकडून मान्यता आणि आर्थिक सुरक्षिततेची कवच मिळणार आहे. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख दिली जाईल, तसेच त्यांच्या कार्यादरम्यान अपघात झाल्यास १० ते १५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
सर्पमित्रांच्या विविध मागण्यांवर मंत्रालयात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य वन्यजीव संरक्षक एम. श्रीनिवास राव, तसेच अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणीमित्र संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संभाजी पाटील आणि संघटनेचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
सर्पमित्रांसाठी विचाराधीन प्रमुख मुद्दे:
- अपघाती मृत्यू किंवा दुखापतीसाठी १०-१५ लाख रुपयांचा विमा कवच
- स्वतंत्र पोर्टल व ओळखपत्राची व्यवस्था
- पोलीस व्हेरिफिकेशनसह अधिकृत नोंदणी आणि मार्गदर्शक तत्त्वे
- आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या फ्रंटलाइन वर्कर यादीत समावेश
बावनकुळे यांनी सांगितले की, सर्पमित्रांच्या योगदानाचा विचार करून या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि संबंधित विभागांना लवकरच निर्देश देण्यात येतील.
राज्य वन्यजीव संरक्षक एम. श्रीनिवास राव यांनी सर्पमित्रांना वन्यजीव संरक्षण कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.
सर्पदंश पीडित शेतकऱ्यांना लाभ
सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांच्या कुटुंबियांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा’ लाभ देण्याबाबतही निर्णय लवकरच घेतला जाईल. याशिवाय, सर्पदंशावर तातडीने उपचार मिळावेत यासाठी ‘क्लिनिक ऑन व्हील’ उपक्रम सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच दिले आहेत.