अलिबाग : अलिबाग तालुक्यातील कुरुळ गावच्या सरपंच पदी अॅड. सुलभा जनार्दन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सोमवार, दि. २९ मे रोजी त्यांनी सरपंच पदाचा कारभार हाती घेतला. सरपंच पदाच्या पोट निवडणुकीसाठी सुलभा पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी उपस्थित होते.
स्व. अॅड. जनार्दन पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने सरपंच पद रिक्त झाले होते. या पदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर कुरुळ ग्रामस्थांनी एकमताने जनार्दन पाटील यांच्या पत्नी सुलभा पाटील यांना बिनविरोध निवडून देण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे कोणीही उमेदवारी अर्ज न भरता सुलभा पाटील यांना बिनविरोध निवडून दिले. सोमवारी सकाळी १० च्या सुमारास अॅड. सुलभा पाटील यांनी कुरुळ ग्रामस्थांच्या साक्षीने सरपंच पदाचा कारभार हाती घेतला.