प्रतिनिधी
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. महिला व बाल विकास विभागाने 30 जुलै रोजी शासन निर्णय जारी करत 2,984 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत हा हप्ता लाभार्थींना मिळण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारने जुलै 2024 पासून सुरू केलेल्या या योजनेतून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट खात्यात दिले जातात. राज्य शासनाने एकूण 28,290 कोटी रुपयांची तरतूद केली असून, त्यातील जुलै महिन्यासाठीचा पहिला हप्ता वितरित करण्यास आता मंजुरी देण्यात आली आहे.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, योजना सुरू झाल्यानंतर 2 कोटी 25 लाख महिलांना जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला होता. मात्र, प्राप्त माहितीनुसार 26.34 हजार महिलांनी अयोग्यरीत्या लाभ घेतल्याचे आढळून आल्यामुळे त्यांचा हप्ता जून महिन्यापासून स्थगित करण्यात आला आहे. ही माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्राथमिक तपासणीतून समोर आली आहे.
त्यामुळे आता दरमहा लाभार्थी संख्येत काहीशी घट होत असल्याने, सरकारचा खर्चही तुलनेने कमी होत आहे. यामुळे अधिक पारदर्शकतेने आणि अचूक लाभार्थ्यांपर्यंत रक्कम पोहोचवण्याचे उद्दिष्ट साधले जात आहे.
दरम्यान, ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना मिळणारा जुलै महिन्याचा हप्ता हा योजनेतील 13 वा हप्ता ठरणार आहे, आणि तो 2-3 दिवसांत थेट त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
