मुंबई, दि. ३१ : मालेगाव येथे 2008 साली घडलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना NIA विशेष न्यायालयाने तब्बल 17 वर्षांनंतर निर्दोष मुक्त केले आहे. या निर्णयामुळे एक अत्यंत चर्चिलेला आणि दीर्घकालीन खटला न्यायालयीन निष्कर्षाला पोहोचला आहे.
मुक्तता मिळालेल्या आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.
न्यायालयाने नमूद केले की, या प्रकरणात लावण्यात आलेली UAPA (अनलॉफुल ऍक्टिविटीज प्रिवेन्शन ॲक्ट) अंतर्गत आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. तसेच, राहिरकर, पुरोहित आणि उपाध्याय यांच्या संस्थेला मिळालेला निधी स्फोटाच्या कटासाठी वापरण्यात आल्याचा आरोपही पुराव्याअभावी सिद्ध होऊ शकला नाही.
सरकारी पक्षाने स्फोटात झालेली जीवितहानी आणि जखमांबाबत तथ्य सादर केली असली, तरी स्फोटासाठी वापरलेले आरडीएक्स, ते ठेवलेली दुचाकी, आणि तिचा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याशी असलेला संबंध यावर कोणताही ठोस पुरावा न्यायालयासमोर मांडता आलेला नाही, असे निरीक्षण नोंदवण्यात आले.
निकालानंतर प्रतिक्रिया देताना आरोपी समीर कुलकर्णी यांनी, “हे आमचं पुनर्जन्म आहे. आम्ही 17 वर्ष पिडा भोगली,” असे म्हणत न्यायालयाचे आभार मानले.
साध्वी प्रज्ञासिंह यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “गेल्या 17 वर्षांत अपमानाचे दशावतार पाहिले. एक संन्यासी म्हणून मी जगले, नाहीतर जगू शकले नसते. आज हिंदुत्व आणि भगव्याचा विजय झाला.”