मुंबई : भाजप आमदार परिणय फुके यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या वक्तव्याला उत्तर देताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपच्या काही आमदारांवर थेट निशाणा साधत, “भाजपच्या काही आमदारांना माज आलाय,” अशी तीव्र टीका केली. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, असे आवाहनही त्यांनी केलं.
कदम म्हणाले, “परिणय फुके यांच्या विधानावर स्वतः फडणवीसांनी लक्ष घालावं. कोणाला माज चढला असेल, त्यांचा माज उतरायला हवा. शिवसेनेबद्दल बोलण्याआधी प्रत्येकाने स्वतःचा इतिहास तपासावा.”
“शिवसेनेचा बाप कोण?”
रामदास कदम यांनी भाजप आमदार विजयकुमार गावित यांच्यावरही टीका केली. “तीन-तीन लाख मतांनी निवडून आलेल्या आमदारांबद्दल युतीतील नेते अशा पद्धतीने बोलत असतील, तर हा गंभीर प्रकार आहे. फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी याकडे लक्ष द्यावं,” अशी मागणी त्यांनी केली.
शिवसेना-भाजप युतीबाबत बोलताना ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा मोठा निर्णय घेतला. ३५ देशांनी त्याची दखल घेतली. अडवाणी, मुंडे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ही युती टिकवली होती. ही परंपरा शिंदेंनी पुढे नेली.”
भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर
भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना ‘बामदास छमछम’ असे म्हणत टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना कदम म्हणाले, “आमच्याकडे शिमग्यात गोमू नाचते. स्टेजवर नाचणाऱ्यांना काय म्हणतात, तो शब्द मी वापरणार नाही. भास्कर जाधव यांना जनता आधीच उत्तर देऊन बसली आहे. ते अगदी काठावर निवडून आले आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.