नंदुरबार : महायुतीमधील अंतर्गत संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. भाजप आमदार परिणय फुके यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आधीच तापलेलं वातावरण आणखी चिघळलं आहे. आता भाजपचे माजी मंत्री आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाच्या आमदारांची “मस्ती जिरवण्याची” थेट धमकी दिल्याने महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्ष – भाजप आणि शिंदेगट – यांच्यातील वाद अधिक उघडपणे समोर येऊ लागले आहेत.
डॉ. गावित नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. त्यांनी म्हटलं, “शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांची मस्ती जिरवायची आहे. नंदुरबार जिल्ह्यात महायुती करू नये, अशी विनंती आम्ही पक्षश्रेष्ठींना केली आहे.”
गावित यांनी आमदार पाडवी यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितलं की, “करदाते असलेल्या पाडवी यांच्या पत्नीच्या नावावर १४ घरे आहेत, तरीही त्यांच्या पत्नी आणि मुलाने पंतप्रधान आवास योजना व शबरी घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे.” या आरोपांमुळे भाजप आणि शिंदेगट आमदारांमध्ये थेट उघड वाद पेटल्याचं स्पष्ट दिसत आहे.
शिंदे गटाची जोरदार प्रतिक्रीया; रघुवंशींचा गावितांवर पलटवार
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना विधान परिषदेचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी डॉ. गावितांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “डॉ. विजयकुमार गावित हे देशातील आदिवासी खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारे मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी इतकं पाप केलं, तरी त्यांच्या विरोधात काहीही कारवाई झाली नाही. आता अशा माणसाने आमच्यावर खोट्या तक्रारी केल्या, तरी आम्हाला काही फरक पडत नाही.”
रघुवंशी पुढे म्हणाले, “गावितसारखा पापी माणूस आमच्यावर बोलतोय, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होणारच.”
महायुतीत वाढतेय दरी?
महायुतीतील भाजप आणि शिंदे गट यांच्यातील संबंधांमध्ये सातत्यानं तणाव वाढताना दिसतो आहे. परिणय फुके यांच्या ‘शिवसेनेचा बाप’ या विधानानंतर वातावरण तापलं होतंच. त्यानंतर त्यांनी माफी मागून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता गावित यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कार्यकर्त्यांच्या पातळीवरही या वादाचा परिणाम दिसून येतोय.