मुंबई: महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये नाराजीचे सूर वाढताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन शिवसेनेतील अस्वस्थतेबाबत स्पष्टपणे भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून होणाऱ्या अनादरामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी वाढत असून, पक्षाला सत्तेत समान वाटा मिळावा अशी शिंदे यांची मागणी होती.
गेल्या एका महिन्यात शिंदे यांनी तीन वेळा दिल्ली दौरा केला. सुरुवातीचे दोन दौरे निष्फळ ठरले. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात त्यांना अखेर मोदी आणि शहा यांची भेट मिळाली. शहा यांच्यासोबतच्या २५ मिनिटांच्या चर्चेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबरोबरच, मंत्र्यांवर सुरू असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयशक्तीवर शिंदे नाराज आहेत. शिंदेसेनेच्या काही मंत्र्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, काही निर्णय पुन्हा बदलण्यात आले आहेत. या प्रकारामुळे शिंदेसेनेत असंतोष आहे. याच मुद्द्यांची माहिती शिंदे यांनी थेट मोदी-शहांना दिली.
शिंदेंचा अप्रत्यक्ष इशारा?
न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, शिंदे यांनी भाजप नेतृत्त्वाला अप्रत्यक्ष इशारा दिला की, “जर आमच्या नेत्यांचा छळ थांबला नाही, तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल आणि भाजपला केवळ बाहेरून पाठिंबा देईल.” मंत्र्यांची कोंडी थांबवावी, समान वाटप व्हावे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
शिवसेना मंत्र्यांवर वाढलेले दबावाचे वातावरण
शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम आणि दादा भुसे अलीकडे वादात सापडले आहेत. त्यांच्या कारभारावर भाजपकडून नाराजी आहे आणि फडणवीस कारवाईच्या भूमिकेत आहेत. दुसरीकडे, शिवसेना नेत्यांना वाटते की हे सगळं ठरवून केले जात आहे. त्यामुळेच पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे.