फक्त मतदानासाठी होती का ही योजना? — लाडक्या बहिणींचा सरकारला सवाल
विश्वास निकम
कोलाड : रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण. दरवर्षीप्रमाणे यंदाही बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधली, प्रेमाने ओवाळणी केली आणि भावाने गिफ्ट देऊन आपलं नातं अधिक घट्ट केलं. पण याच सणाच्या दिवशी हजारो ‘लाडक्या बहिणी’ंसाठी एक कटू अनुभव उभा राहिला. राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मिळणारी मासिक रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालीच नाही. यामुळे अनेक महिलांचा संताप ओसंडून वाहत आहे. “निवडणूक झाली, मतं मिळाली आणि आता पैसे गायब — मग ही योजना फक्त मतदानासाठीच होती का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
लाडकी बहीण योजना 2024 विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू केली होती. या योजनेतून राज्यातील गरजू महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाणार होती. प्रचारादरम्यान काही नेत्यांनी तर दरमहिना ₹2100 देण्याचे ठाम आश्वासन दिले होते. सुरुवातीच्या काही महिन्यांत या योजनेचा लाभ कोणतीही चौकशी न करता दिला गेला. अनेकांच्या खात्यात वेळेवर पैसे जमा झाले, ज्यामुळे महिलांच्या मनात सरकारबद्दल सकारात्मकता निर्माण झाली.
पहिल्या टप्प्यात नोकरी करणाऱ्या, चारचाकी वाहनधारक आणि बँक खाते-आधार लिंक असलेल्या महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर सर्वसामान्य महिलांनीही आपली खाती आधारशी जोडून लाभ मिळवायला सुरुवात केली. काही महिन्यांपर्यंत ही प्रक्रिया सुरळीत सुरू राहिली. मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून परिस्थिती बदलली. हळूहळू असंख्य महिलांच्या खात्यात पैसे जमा होणं थांबलं.
याबाबत विचारणा केल्यावर लोकप्रतिनिधींकडून आणि प्रशासनाकडून एकच उत्तर मिळत आहे — “पैसे बंद झालेले नाहीत, तपासणी सुरू आहे, लवकरच जमा होतील.” मात्र महिलांच्या मनात वेगळाच संशय आहे. “शासनाच्या तिजोरीवर या योजनेमुळे मोठा आर्थिक भार पडत असल्यानेच आता पैसे रोखण्यात आले आहेत का?” असा प्रश्न त्यांच्या मनात आहे.
महिलांचा आरोप आहे की, निवडणुकीच्या आधी कोणत्याही प्रकारची पात्रता तपासणी न करता थेट पैसे देण्यात आले. त्यावेळी हे ‘सर्व बहिणींसाठीच’ असल्याचा संदेश दिला गेला. पण आता अचानक तपासणीच्या कारणावरून लाभ थांबवला गेला आहे. रक्षाबंधनासारख्या भावनिक सणालाही त्यांना रिकाम्या हाताने जावं लागल्याने नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे.
“निवडणुकीच्या वेळी गोड बोलून मतं मिळवली, आता बहिणींची आठवणच नाही,” “रक्षाबंधनाला भाव विसरला, सरकारनंही विसरलं,” “फक्त मतांसाठी योजना, सणाला पैशांचा पत्ता नाही” — अशा प्रतिक्रिया सध्या महिलांमध्ये उमटत आहेत.
लाडकी बहीण योजनेचा पुढचा प्रवास काय असेल, हे अद्याप स्पष्ट नाही. पण सध्या तरी महिलांचा रोष आणि सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. रक्षाबंधनासारख्या भावनिक सणाला अशा प्रकारे निराशा हातात आल्याने, ‘लाडकी बहीण’ योजना राजकीय चर्चेत पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.
