उद्योजक अब्बासशेठ अनवारेंचा मदतीचा हात; महागांव (तळा) वरदायीनी विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप
शशिकांत मोरे
धाटाव : शहरांच्या आसपासची गावे आणि काही पाड्या सक्षम असल्या तरी राज्यातील अनेक दुर्गम भागातील गावांची परिस्थिती आजही दयनीय आहे. विशेषतः आदिवासी व ठाकूर समाजातील विद्यार्थ्यांना भौतिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत. लोकप्रतिनिधी केवळ मतांसाठीच गावात येतात, पण मूलभूत सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, असे जाणिवेचे आवाहन पत्रकार राजेंद्र जाधव यांनी केले.
महागांव (तळा) येथील वरदायीनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मराठी उद्योजक अब्बासशेठ अनवारे यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पुस्तके आदी साहित्याचे वाटप केले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल उपस्थितांनी कौतुकाचा वर्षाव केला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब देशमुख, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष नाना खरिवले, नाझ एजन्सीचे राजू डफल, पोलीस पाटील कमळाकर मांगले, पत्रकार शशिकांत मोरे, रवींद्र कान्हेकर, महेंद्र मोरे, उद्धव आव्हाड, माजी विद्यार्थी जितेंद्र जाधव, समीधा अष्टीवकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रभाकर कोरे सरांनी विद्यालयातील वास्तव परिस्थिती मांडली. त्यांनी सांगितले की, शाळेत मोठ्या संख्येने आदिवासी व ठाकूर समाजातील मुले शिक्षण घेतात. अनेक विद्यार्थी पाच-सहा किलोमीटरवरून पायी शाळेत येतात. दहावीपर्यंत शिक्षण उपलब्ध असले तरी त्यापुढील शिक्षणासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे उच्च शिक्षणाची इच्छा असणाऱ्या मुलांचे स्वप्न अपूर्ण राहते.
माजी विद्यार्थी जितेंद्र जाधव यांनी आपल्या भाषणात शाळेबद्दलची आत्मीयता व्यक्त केली. “ही माझी शाळा आहे, येथे शिकणाऱ्या प्रत्येक मुलांसाठी मी सातत्याने मदत करत राहीन. माझ्या मदतीतून ही मुलं मोठी होऊन आपलं स्थान निर्माण करतील, हेच मला पाहायचं आहे,” असे ते भावूकपणे म्हणाले. मुख्याध्यापक धनाजी व्यवहारे यांनी जितेंद्र जाधव यांच्या सातत्यपूर्ण मदतीचे कौतुक करताना सांगितले की, “या विद्यालयातून अनेक विद्यार्थी डॉक्टर, वकील बनले, पण विद्यार्थी भावाची जाणीव ठेवून मदत करणारे हात कमी आहेत.”
पत्रकार राजेंद्र जाधव यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी सांगितले की, दुर्गम भागातील विद्यार्थी अतिशय चपळ आणि बुद्धिमान असतात, पण त्यांना योग्य मार्गदर्शन व संधी मिळणे गरजेचे आहे. ‘कसे बोलावे, कसे चालावे, कसे पाहावे’ याबाबत टिप्स देत त्यांनी अनेक गमतीशीर किस्से सांगितले. मुलांना गाणी, विडंबने सादर करून त्यांनी वातावरण रंगवले.
उद्योजक अब्बासशेठ अनवारेंनी मुलांना शैक्षणिक साहित्य देत समाजातील इतर दानशूर व्यक्तींनाही अशा कार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अजूनही शिक्षणाच्या संधी, साधनं आणि प्रेरणा मिळण्यासाठी समाजाने सामूहिकपणे पुढे यावे, हा एकमुखी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.