मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि परवडणाऱ्या प्रवासासाठी मोठा निर्णय घेत, राज्य सरकारने १२ आसनी स्कूल व्हॅनला मंजुरी दिली आहे. आतापर्यंत १३ आसनांपेक्षा जास्त क्षमतेच्या बसेसना परवानगी होती, त्यामुळे लहान रस्त्यांवरून जाण्यास अडचण आणि भाड्याचा भार असल्याने अनेक पालक अनधिकृत रिक्षांचा पर्याय निवडत होते. आता मात्र ही समस्या सुटणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्र मोटार वाहन व शालेय बसेस नियम २०११ मध्ये सुधारणा करून १२ आसनी स्कूल व्हॅनची व्याख्या निश्चित केली आहे. लवकरच अधिसूचना काढून अधिकृत परवाने वाटप सुरू होईल.
आधुनिक सुरक्षा सुविधा
नव्या व्हॅनमध्ये BS-VI इंजिन, जीपीएस, सीसीटीव्ही, पॅनिक बटण, स्पीड गव्हर्नर (४० किमी प्रतितास वेगमर्यादा), दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म, अग्निशमन प्रणाली, इमरजेंसी एक्सिट, स्टोरेज रॅक आणि लहान विद्यार्थ्यांसाठी पायरी अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा समावेश असेल. वाहनाच्या छतावर शाळेचे नाव आणि योग्य आसनरचना बंधनकारक असेल.
विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा
लहान व्हॅन अरुंद रस्त्यांवरून जाऊन विद्यार्थ्यांना थेट घरातून शाळेत आणि परत आणू शकतील. बसचे वाढते भाडे आणि रिक्षातील धोकादायक कोंडी टाळली जाईल. रिक्षांच्या तुलनेत चार चाकी व्हॅन अधिक स्थिर, सुरक्षित व प्रशस्त असल्याचे प्रशासनाने सांगितले.
२०१८ पर्यंत राज्यात स्कूल व्हॅनना परवाने मिळत होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव काही नागरिकांनी याचिका दाखल केल्याने ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता केंद्राच्या एआयएस-२०४ मानकांनुसार नियमावली तयार करून व्हॅन परवानगीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येत आहे.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक हे सरकारचे प्राधान्य असून, यामुळे बेरोजगारांना रोजगाराचाही मार्ग मोकळा होईल. महाराष्ट्र हे अत्याधुनिक सुरक्षा सुविधांसह स्कूल व्हॅन चालवणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.”
