मुंबई : राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसवणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी पूर्वी 15 ऑगस्ट 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र वाहनधारकांकडून अपेक्षेइतका प्रतिसाद न मिळाल्याने सरकारने मुदत वाढवून आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची अंतिम तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परिवहन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 1 डिसेंबर 2025 पासून HSRP प्लेट नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कारवाई केली जाईल. यासाठी वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन HSRP बसविण्यासाठी अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक आहे. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांवर कोणतीही कारवाई होणार नाही, असे परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांनी लवकरात लवकर HSRP प्लेट बसवावी, अन्यथा मुदत संपल्यानंतर नियमांनुसार दंड आणि इतर कारवाईला सामोरे जावे लागेल.
शासनाच्या नव्या निर्णयानुसार, HSRP प्लेट न लावलेल्या वाहनांवर अनेक निर्बंध लागू होणार आहेत. यात वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढवणे किंवा उतरवणे, वाहन पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण यांसारख्या प्रक्रिया थांबवण्यात येतील. तसेच वायुवेग पथकाद्वारे तपासणीदरम्यान जप्त झालेल्या वाहनांना HSRP प्लेट बसविल्याशिवाय सोडण्यात येणार नाही. मात्र योग्यंता प्रमाणपत्र नूतनीकरण या प्रक्रियेला अपवाद देण्यात आला आहे.
HSRP (High Security Registration Plate) ही स्टेनलेस स्टीलची बनवलेली छेडछाड-प्रतिबंधक क्रमांक प्लेट असून त्यावर विशेष कोड, होलोग्राम आणि लेझर एनग्रेव्हिंग असते. यामुळे वाहनांची चोरी रोखणे, बनावट नंबर प्लेट टाळणे आणि वाहनांची ओळख पटवणे सोपे होते.
वाहनधारकांनी दिलेल्या मुदतीत HSRP प्लेट बसवून कायदेशीर अडचणी आणि दंड टाळावा, असे आवाहन शासन आणि परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
