मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्यात महायुतीला तब्बल २३८ जागा मिळाल्या, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी केला. या वक्तव्यामुळे महायुतीत नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे.
विरोधकांनी या योजनेवर महिलांचा स्वाभिमान दीड हजार रुपयांत विकत घेतल्याचा आरोप केला होता. मात्र, “सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना या योजनेचे महत्त्व काय कळणार,” असा पलटवार तटकरे यांनी केला. त्यांनी योजनेचे सर्व श्रेय अजित पवार यांना देत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांसाठी असतील, असेही स्पष्ट केले.
मतदारयाद्यांवरील वादांवर भाष्य करताना तटकरे म्हणाले, “यादीत काहीही घोळ नाही. हरकतींसाठी पुरेसा वेळ दिला जातो, तरीही विरोधक ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवत आहेत. मतदानाच्या दिवशी आक्षेप नसतात, पण महिन्यांनंतर राजकीय हेतूने वाद उभे केले जातात.”
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी महिलांना आवाहन केले की, “मतांच्या आकडेवारीकडे न पाहता मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. सरकारचे काम नागरिकांपर्यंत पोहोचवा. सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे चांगले काम प्रभावीपणे मांडण्याची कला आत्मसात करा.”