विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील धामणसई विभागातील दहा गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येत इको सेंसिटिव्ह झोनचा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी करत रोहा तहसीलदार, प्रांताधिकारी आणि वनविभाग अधिकाऱ्यांना निवेदन दिले. केंद्र सरकारने जारी केलेल्या मसुद्यानुसार रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांतील 437 गावे इको सेंसिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये रोहा तालुक्यातील तब्बल 119 गावे वन व पर्यावरण विभागाच्या सर्वेक्षणात संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, हा झोन लागू झाल्यास त्यांची शेती, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, विटभट्टी, शेळीपालन, मत्स्यशेती यांसारखे पारंपरिक व पूरक व्यवसाय उद्ध्वस्त होतील. जमिनीचा विकास थांबेल, शेतघरे, गोठे, लघु व कुटीर उद्योग उभारणे अशक्य होईल. यामुळे पुढील काळात रोजगाराच्या संधी कमी होऊन उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

पिंगळसई, वांदोली, मढाळी, सोनगाव, गावठाण धामणसई, मालसई, मूठवली, सांगडे, उडदवणे, इंदरदेव, अष्टमी तसेच परिसरातील आदिवासी वाड्यांतील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या निवेदनासाठी हजर होते. ग्रामस्थांच्या मते, पर्यावरणाचे रक्षण महत्त्वाचे असले तरी स्थानिकांच्या जगण्याचा हक्क हिरावून घेणारे निर्णय स्वीकारले जाणार नाहीत.
शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाला पर्यावरणीय निर्बंध रद्द करून दिलासा देण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा, हा निर्णय मागे घेण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे रोहा तालुक्यात इको सेंसिटिव्ह झोनविरोधातील चळवळीला जोर मिळाला आहे.