रायगड : खालापूर तालुक्यातील कलोते ग्रामपंचायत हद्दीतील कॅप मॅक्सजवळ असलेल्या ‘लाईफ अँड जॉय’ या रिसॉर्टमधील कामगाराचा कलोते धरणात मंगळवारी (दि. 12) सकाळी बुडून मृत्यू झाला. अभय शिवाजी राऊत (वय 23, रा. माजलगाव, जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभय राऊत याने केवळ चार दिवसांपूर्वीच ‘लाईफ अँड जॉय’ या रिसॉर्टमध्ये नोकरी सुरू केली होती. हे रिसॉर्ट कलोते धरणाच्या काठावर असल्याने तो जीन्स आणि टी-शर्टसह थेट पोहण्यासाठी पाण्यात उतरला. काही अंतर तो पोहत गेला, मात्र पाण्याचा विस्तार आणि खोलपणामुळे त्याचा दम गेला. शक्ती क्षीण झाल्याने तो पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ‘हेल्प फाउंडेशन’, खोपोलीच्या पथकाला शोधमोहीमेकरिता बोलावले. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अभय राऊत याचा मृतदेह सापडला. पुढील तपास खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
